चाळीसगाव प्रतिनिधी । आपल्याकडे पाहत असल्याच्या रागातून तिघांनी तरूणाला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहर पोलीस ठाण्याच्या समोरील टपरीवर घडली. याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यासमोरील चहाच्या टपरीवर फिर्यादी प्रभाकर पांडूरंग चौधरी (वय-३८) रा. चौधरी वाडा, चाळीसगाव हे ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बसलेले होते. त्याचवेळी पोलीस ठाण्यात हजेरी लावून संशयित आरोपी जगदीश महाजन, दादू महाजन, संजय घटी सर्व रा. नेताजी चौक चाळीसगाव चहाच्या टपरीवर आले. यातील जगदीश महाजन याने प्रभाकर चौधरी याला माझ्याकडे पाहतो असे बोलून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जगदीश महाजन याने कंमरेतून धारदार शास्त्र काढून वार केले. यात प्रभाकर गंभीर जखमी झाला. जखमी प्रभाकर यांच्या वडीलांना देखील इतर दोघांना मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना शहर पोलीसांनी अटक केली आहे.