चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पगारातून गरजू कुटुंबांना मदत केली होती. पोलिस कर्मचाऱ्यांकडून २ लाख २५ हजार रूपये तर शहरातील गुजरात अंबुजा कंपनी यांच्या मदतीने चाळीसगाव शहरातील ११११ गरजू कुटुंबाना किरणा मालाचे वाटप त्यांच्या घरी जावून करण्यात येणार आहे.
चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोनि विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि आशिष रोही, मयूर भामरे, पोउनि महावीर जाधव, विजय साठे, डी.बी.प्रमुख बापूराव भोसले, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार , चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे लॉकडाउन विचारात घेता, अनेक हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, याची जाणीव लक्षात घेऊन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे पगारातून जमा केलेल्या राकमेतून मागे गरीब कुटुंबाना मदत केली होती आता देखील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या पगारातील जमा राकमेतून २ लाख २५ हजार व चाळीसगाव येथील गुजरात अंबुजा कंपनी यांचेकडील सहाय्य यातून चाळीसगाव शहरातील गरजू व गरीब ११११ कुटुंबाना किराणा मालाचे वाटप त्यांचे घरी जाऊन करण्यात येणार आहे.
यामध्ये गुजरात अंबुजा कंपनीकडून ४००० किलो तांदूळ व ११११ तेलाच्या बॅग असे किराणा साहित्य प्राप्त झाले असून, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या जमा रकमेतून ११११ गव्हाच्या पिठाच्या प्रत्येकी 5 किलोच्या बॅग, ११११ किलो डाळ, १००० किलो तांदूळ असा किराणा माल विकत घेऊन तो प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी ५ किलो गव्हाचे पीठ, ५ किलो तांदूळ, ५ किलो डाळ, ५ लिटर तेल असे किराणा मालाचे किट एकत्रितपणे शहरातील गरजू व गरीब कुटुंबांना घरपोच देण्यात येणार आहे.
यांची होती उपस्थिती
या वाटपाचा कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता कारगाव रोडवरील अल्पबचत भवन येथे पार पडला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी कैलास गावडे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, आर.डी.चौधरी, संजय सोनार, देविदास पाटील, मुराद पटेल, सूर्यकांत कदम, सपोनि आशिष रोही, मयुर भामरे, पोउनि महावीर जाधव, विजय साठे, डीबीचे बापूराव भोसले, गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.