चाळीसगाव आगारात जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त चाळीसगाव परिवहन महामंडळात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक मनोहर आंधळे व दिव्य मराठीचे प्रतिनिधी अजय कोतकर हे उपस्थित होते.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. अभिजात मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन चाळीसगाव आगारात मराठी भाषा गौरव दिन आगार व्यवस्थापक संदीप निकम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक मनोहर आंधळे व दै.दिव्य मराठीचे प्रतिनिधी अजय कोतकर हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात प्रवाशांना पुष्प देऊन तसेच साखर पेढे वाटून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख अतिथी आंधळे यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगून अभिजात मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा असल्याचे सांगितले. तसेच मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषिकांची असून जगात टिकण्यासाठी अन्य भाषा जरी महत्त्वाच्या असल्या तरी आपल्या मातृभूमीत पाय घट्ट रोवून उभे राहण्यासाठी मराठी भाषेला पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर मराठी भाषेचा संस्कार प्रत्येक मराठी माणसाच्या घरात रुजवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने कटिबद्ध असण्याची गरज असून भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, कार्यशाळा अधीक्षक मनोज भोई, पाळी प्रमुख आनंदा साळुंखे, वाहतूक नियंत्रक किरण काकडे, भाऊसाहेब हडपे, दीपक जाधव, संजय जाधव, तुषार महाजन, अनिल जाधव, आशा निकम,संगिता देवकर, दिपाली पाटील, सुधीर जाधव, शैलेश राठोड, किरण पाटील, सरोज पाटील, चेतन वाघ, आबा चौधरी, पी.जी.माळी, मुकुंदा सोनवणे, निलेश निकुंभ, दीपक चौधरी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम पाटील तर आभार किशोर मगरे यांनी केले.

Protected Content