चाळीसगाव, प्रतिनिधी । भंगार दुकानातील काचेच्या बाटल्या दुसऱ्याच्या दुकानासमोर टाकून एकाला जबर मारहाण केल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहर पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, निलेश भास्कर साळुंखे (वय-४२ रा. गांधी चौक ता. चाळीसगाव) हा वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून शहरातील दत्तवाडी येथे पंक्चर व गाडी वॉशिंगचे दुकान आहे. त्यालगतच अंडा आम्लेटची गाडी आहेत. वरील दुकाने चालवून निलेश आपला उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान २३ जानेवारी रोजी निलेश दुकान सुरू असताना तो बाहेर गेला. मात्र तो परतल्यावर समोरच्या भंगार दुकानातील काचेच्या बाटल्या दुकानासमोर टाकलेल्या होत्या. तेव्हा निलेश यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपींकडून त्यास शिवीगाळ करून तुझी दुकान येथून उचलून घे असे म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान पत्नी शितल साळुंखे सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या गळ्यातील सोन्याची पोत व निलेशच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याचे चैन व १०,००० हजार रोख आरोपीने चोरून नेले. तत्पूर्वी अल्ताफ अकील खाटीक यांनी निलेश याच्या छातीवर व तोंडावर ठोसे मारली. तसेच इतरांनाही लाथा बुक्क्या बरोबर तीक्ष्ण हत्याराने निलेशच्या डोक्यात मारून दुखापत पोहोचवली. हि घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चाळीसगाव न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहर पोलिस स्थानकात निलेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अकिल दादू खाटीक (४५), अल्ताफ अकील खाटीक (२५), तौसीफ शकील खाटीक (२२), मुस्ताफ लतीफ खाटीक (२३) व खलील शब्बीर खाटीक (४५) (सर्व रा. खाटीक गल्ली, रिंग रोड ता. चाळीसगाव) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.