चाळीसगावात लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या दुकानांवर पालिकेची कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावात लॉकडाऊन उल्लंघन केलेल्या दुकानांवर आज नगरपालिकेने धडक कारवाई करत दंड वसूल केला आहे. पालिकेने केलेल्या कारवाईमुळे दुकानांमध्ये खळबळ उडाली आहे.

सध्या देशभर कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे ही साखळी तोडण्याच्या दृष्टीने शासनाने सर्वत्र जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानांना लॉकडाऊनच्या काळात बंदीचे आदेश काढलेले असताना काही दुकाने चोरून लपून तर काही राजरोसपणे सुरू ठेवून हे दुकानदार नागरिकांच्या व स्वतःच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याने व सततच्या लॉकडाऊन पाळण्याच्या आवाहनाला धाब्यावर बसवल्याने आज चाळीसगाव नगरपालिका मार्फत आरोग्य सभापती सायली रोशन जाधव सहाय्यक मुख्याधिकारी स्नेहा फडतरे मॅडम सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव, कर निरीक्षक राहुल साळुंखे, दिनेश जाधव तसेच सर्व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी नपा मुख्याधिकारी मोरे, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, उपाध्यक्ष आशाताई रमेश चव्हाण, गटनेते राजीव देशमुख, गटनेते संजय रतनसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आज धडक दंडात्मक कारवाई केली. दुकानदारांकडून जवळपास २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कारवाई झालेल्यांमध्ये कुमार मोबाईल, किशोर इलेक्ट्रॉनिक, महाराष्ट्र रेडिओ, जगदंबा इलेक्ट्रॉनिक, जीएम ट्रेडर्स, सूर्या फॉम, गणेश टिंबर, पूजा स्वीट्स, गायत्री मेडिकल, नम्रता इलेक्ट्रॉनिक, प्रीतम बूट चप्पल, गुणवंत मेडिकल, पूजा एलेक्ट्रोनिक, मुस्कान लेडीज वेअर, नमो मेडिकल, यश चोपडा, मनमंदिर कापड दुकान, यांचा समावेश आहे यातील मेडिकल दुकान जरी जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असले तरी या काही मेडिकल मधील कर्मचाऱ्यांनी मास्क लावला नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १५ ते १७ मे या कालावधीमध्ये चाळीसगाव शहरात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नगरपालिकेने केलेल्या या धडक कारवाईचे संपूर्ण शहरातून कौतुक व स्वागत होत आहे.

Protected Content