चाळीसगाव, प्रतिनिधी | पोलीस भरतीसाठी सरावासाठी तरुणांना मैदान उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते हर्षल चौधरी यांनी मोकळ्या जागेची साफसफाई करून तरुणांना मैदान उपलब्ध करून दिले आहे.
अनेक तरूण हे पोलिस भरतीचे स्वप्न घेऊन तयारी करत असतात. ते लेखी पाप्रीक्षेचा अभ्यास करत असतांना त्यांना मैदानी खेळांचा सराव आवश्यक असतो. मात्र, मैदानी खेळासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे येथील तरूणांनी पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेल्या गोळा फेक व लांब उडीसाठी सुसज्ज असे मैदान सरावासाठी तयार करून मिळावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल चौधरी यांच्याकडे केली होती. हर्षल चौधरी यांनी पुढाकार घेत तरूणांना या सुविधा मिळाव्यात म्हणून प्रभाग क्रमांक चार मधील निर्मल पेट्रोलपंपाच्या पाठीमागे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत सरावासाठी मैदान तयार करून दिले आहे. यात त्यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून सर्व काटेरी झाडे, रोप काढून त्यानंतर रोलर लावून सपाटीकण करून मैदान तयार करून दिले. यातून पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची अडचणीची सोडवणूक झाली आहे. या मैदानाचे हर्षल चौधरी यांच्या हस्ते निर्मल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पोलीस भरतीसाठी लोकार्पण प्रजासत्ताक दिना निमित्त करण्यात आले.