चाळीसगाव प्रतिनिधी । बर्याच काळापर्यंत कोरोनाला थोपवून धरणार्या चाळीसगाव तालुक्यात २४ तासांमध्ये नवीन १९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यात बर्याच काळापर्यंत कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, लॉकडाऊनच्या उत्तरार्धात येथे कोरोनाचा संसर्ग आढळून आला. यानंतर तालुक्यात सातत्याने रूग्ण आढळून येत आहेत. यात आता हा संसर्ग वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच आज तब्बल १९ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील १६ रूग्ण हे शहरातील तर तीन ग्रामीण भागातील आहेत.
शहरातील बाराबाई मोहल्ल्यात सर्वाधीक १० रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत देवी गल्ली; भवाली; भीमनगर; हनुमान वाडी; अहिल्या देवी नगर; पाटील वाडा; दस्के बर्डी व तांबोळे येथेही रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या रूग्णांचा रहिवास असणारा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला असून या भागात फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.