चालते — फिरते रेल्वे रुग्णालय ‘लाईफलाईन एक्सप्रेस’

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय रेल्वेनं जगभरातील पहिली हॉस्पिटल ट्रेन बनवली आहे. तिला ‘लाईफलाईन एक्सप्रेस’ असं नाव देण्यात आलं आहे. ही ट्रेन म्हणजे एक चालतं-फिरतं रुग्णालय आहे.

हे हॉस्पिटल म्हणजे अनेक टायरवर उभारलेलं एक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. या हॉस्पिटल ट्रेनमध्ये सर्व सुविधा आहेत. इथं अनेक दुर्धर आजारांवरही उपचार केला जाऊ शकणार आहे. सर्वात प्रथम भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पिटल ट्रेनची उभारणी केली आहे. त्यानंतर आता अन्य देशही अशा हॉस्पिटल ट्रेन सुरु करत आहेत.

या रेल्वेचं नाव लाईफलाईन एक्सप्रेस आहे आणि चाकांवरील रुग्णालय अशीही या रेल्वेची ओळख आहे. महत्वाची बाब म्हणजे या हॉस्पिटल ट्रेनची सुरुवात आज नाही तर १९९१ मध्ये म्हणजे 29 वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. ही हॉस्पिटल ट्रेन देशभरातील अशा प्रत्येक भागात जाते, जिथे आतापर्यंत आरोग्य व्यवस्थेची चांगली सुविधा नाही. या चाकांवरील रुग्णालयाद्वारे देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो.

 

ही हॉस्पिटल ट्रेन 7 डब्ब्यांची आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची एक टीम तैनात आहे. लाईफलाईन एक्सप्रेस आतापर्यंत 19 राज्यांमध्ये पोहोचली आहे. या ट्रेनच्या माध्यमातून १३८ जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील तब्बल १२ लाख ३२ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये १ लाख ४६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.

या ट्रेनच्या माध्यमातून कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार करण्यात येतात. या ट्रेनमध्ये २ अंत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ५ ऑपरेटिंग टेबल आहेत. यासह ट्रेनमध्ये मेडिकल स्टाफ रुमही आहे.

ही हॉस्पिटल ट्रेन देशातील वेगवेगळ्या भागातून प्रवास करते. आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार ती वेगवेगळ्या स्टेशन्सवर थांबते आणि तिथल्या स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातात. देशातील अनेक शहरांमध्ये गेल्यानंतर ही ट्रेन तिथे काही दिवस मुक्काम करते. यादरम्यान तिथल्या रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते.

एखाद्या आजारावर ट्रेनमध्ये उपचार होत नसेल तर जवळच्या मोठ्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान ही हॉस्पिटल ट्रेन स्थानिक प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करते.

Protected Content