मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱयांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही असा सांगत शिवसेनेने आज भाजपवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातल्या संपादकीयमध्ये आज भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे कौतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या कोविडचा प्रकोप आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवात गर्दी करू नये हे राष्ट्राचे व राज्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढ्यापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला.
यात पुढे म्हटले आहे की,शिवसेनेने अजानप्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ईदच्या शिरकुर्म्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गोयल यांचीही काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत; पण आम्हाला त्याबाबत बखेडा निर्माण करायचा नाही. कारण या देशातील २२ कोटी मुसलमान हे देशाचे नागरिक आहेत. बांगलादेशी घुसखोर, पाकडे, रोहिंगे मुसलमान यांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कठोर आहे; पण आतापर्यंत मोदी सरकारने किती बांगलादेशींचे उत्खनन करून त्यांना बाहेर फेकले ते ट्रोलभैरव भक्त मंडळी सांगू शकतील काय?
यात पुढे नमूद केले आहे की, लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जीनांच्या कबरीवर फुले उधळून व जीना हे इतिहासपुरुष असल्याचे सांगून आलेच होते. पण तेव्हा तो म्हणे, राजशिष्टाचाराचा भाग होता. स्वतः पंतप्रधान मोदी हेसुद्धा खास विमानाने पाकिस्तानात उतरून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचाच केक कापून आले. तेव्हा मात्र भाजपचे हिंदुत्व पातळ झाले नाही, तर तो एक मास्टर स्ट्रोक होता. गोव्यापासून ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री अधिकृतपणे सुरूच आहे. ही विक्री बंद केली तर त्या राज्यातील भाजपच्या मतांवर परिणाम होईल म्हणून सगळं बिनबोभाट सुरू आहे. मग काय हो ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन की काय ते नाही काय? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच असल्याचे यात नमूद केले आहे.