चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, साथीदार गंभीर जखमी

 

जळगाव : प्रतिनिधी । चारचाकीने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार  तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा दुसरा साथीदार  गंभीर जखमी झाला. गुरुवारी दुपारी एक वाजता ममुराबाद नाका परिसरात हा अपघात घडला.

 

अमोल संभाजी पाटील (वय २२, रा. थोरगन, ता. यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.  गोलु रमेश पाटील (वय २३, रा. थाेरगन, ता. यावल) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

 

अमोल व गोलु दोघे मित्र असून गुरुवारी दुचाकीने (एमएच १९ डीएम ७६३६) जळगावात येत होते. ममुराबाद नाक्याजवळ पोहचल्यानंतर समोरुन येणाऱ्या चारचाकीने (एमएच १९ एएक्स ५६५१) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात अमोल हा जागीच ठार झाला. तर गाेलुच्या दोन्ही पाय, हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चारचाकीचालक न थांबताच ममुराबादच्या दिशेने पळुन गेला. यावेळी रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी त्याचा पाठलाग केला. ममुराबाद गावाजवळ नागरीकांनी चारचाकीस अडवले. यानंतर चालकास तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

 

दुसरीकडे अपघातात मृत झालेल्या अमोल याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. तसेच जखमी गोलु याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

या अपघातात मृत झालेल्या अमोल याच्या वडीलांनी तीन महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली आहे. या घटनेतून पाटील कुटुंबीय सावरत असतानाच गुरुवारी झालेल्या दुर्देवी अपघातात अमोल याचाही जीव गेला. मृत अमोल हा जळगावातील सिमेंटच्या गोदामात मजुरीचे काम करीत होता. त्यासाठी तो दररोज दुचाकीने जळगावात ये-जा करीत असे. त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे.

 

Protected Content