पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबे, पितळ सोबत चांदीचे दागिने चमकावून देत असल्याचा बनाव करून ॲसीड व पावडर टाकून दागिन्याचे वजन कमी करून एकाचवेळी गावातील तब्बल ७ जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वसंत नगर गावात समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वसंत नगर गावात २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तांबे, पितळ व दागिने चमकवून देत असल्याचे बबलू अबुल मिया (वय-३३) आणि मोहंमद शहनशा मोहमंद सादीक (वय-२३) रा. गोपालपूर जि.भागलपूर राज्य-बिहार गावातील ग्रामस्थांना सांगितले. त्यांनी काही तांब्याचे आणि पितळाचे भांडे देखील चमकावून दाखविले. आम्ही चांदीचे दागिने देखील चमकावून देतो असे सांगितले. दोघांवर विश्वास ठेवून गावातील भिमाबाई प्रभाकर इंगळे यांनी चांदीच्या पाटल्या व कढे दिले. त्यांच्या पाठोपाट तुकाराम चव्हाण यांची चैन, जमुनाबाई ज्योतीराम चव्हाण, छायाबाई लखीचंद चव्हाण, जबरीबाई पंडीत चव्हाण, मिराबाई गोविंदा राठोड आणि कलाबाई खुशालसिंग राठोड यांनी देखील दागिने दिले. या दोन्ही भामट्यांनी काहीतरी ॲसिड व पावडर दांगिन्यांवर टाकले व त्यांना घासले. त्यानंतर दानिगे परत केले. व तेथून दोघे निघून गेले. त्यानंतर दिलेल्या दागिन्याचे वजन कमी भरल्याने ग्रामस्थांनी फसवणूक झाल्याचे समोर आले. यानंतर ग्रामस्थांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात बबलू अबुल मिया (वय-३३) आणि मोहंमद शहनशा मोहमंद सादीक (वय-२३) रा. गोपालपूर जि.भागलपूर राज्य-बिहार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर शिंपी करीत आहे.