पीजे रेल्वे सुरु करण्यासाठी शेंदुणीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन

शेंदुर्णी प्रतिनिधी । पाचोरा जामनेर पीजे रेल्वे बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेंदुर्णी रेल्वे बचाव कृती समितीचे वतीने आज येथिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन जयघोष करण्यात आला. त्यानंतर धरणे आंदोलन बाबत पीजे रेल्वे बचाव कृती समिती शेंदुर्णीचे सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे नेते  सागरमल जैन यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की पाचोरा जामनेर पीजे रेल्वेला १०० वर्षाचा इतिहास आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे सदरची रेल्वे बंद करण्यात आली होती परंतु इतर रेल्वे सेवा सुरू झाल्यावर सुद्धा पीजे रेल्वे सेवा सुरू करण्यात आली नाही उलट भुसावळ रेल्वे प्रशासनाने ही कायम स्वरुपी बंद करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे त्या विरोधात कृती समितीची स्थापना होउन आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित कृती समितीचे सदस्य माजी उपसरपंच भाजप नेते गोविंद अग्रवाल यांनी रेल्वेचा १९२२ पासून २०२२ या काळातील इतिहास सांगून केंद्रात जिल्ह्याचे नेतृत्व करणारे खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील यांना रेल्वे बंद न करता ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करण्याचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी केंद्रांत पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यात आली असल्याचे सांगितले. कृती समिती सदस्य ज्येष्ठ भाजप नेते उत्तमराव थोरात, कृती समितीचे सदस्य माजी उपसरपंच पंडितराव जोहरे, मनसेचे डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनी पीजे रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचें आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष निलेश थोरात, नगर सेवक माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत खलसे, रामचंद्र निकम गुरुजी, शिवसेनेचे संजय सुर्यवंशी,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना, राष्ट्रिय काँग्रेस, मनसे या प्रमूख पक्षांचे नेते व कार्यकर्ते आंदोलन स्थळी उपस्थीत होते.या वेळी पीजे रेल्वे पूर्ववत करा,पीजे बचाव कृती समितीचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड हे होम कॉरंटाईन आहेत. त्यांनी भ्रमण ध्वनी वरून सदर आंदोलनासाठी पाठिंबा दिला होता. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरनारे यांनी आंदोलन स्थळी थांबून होते. यावेळी सुमारे पन्नास नागरिक कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून मास्क व सामाजिक अंतर ठेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

Protected Content