चमत्कारांवर विश्वास ठेऊन बळी पडू नका : प्रा. कट्यारे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जगात चमत्कार नसतात. चमत्कारांवर विश्वास ठेऊन बळी पडू नका. आपल्या विवेकबुद्धीला घासून योग्य निर्णय घ्या. चमत्कारांची बुवाबाजी कमी होऊन आज मानसिक शोषणाची बुवाबाजी देशभरात धुमाकूळ घालीत आहे. तेव्हा, जनतेला अंधश्रद्धेच्या आजारापासून वाचविण्यासाठी सातत्याने प्रबोधन करावे लागणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी.एस. कट्यारे यांनी केले.

 

समाजकल्याण विभागचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादुटोणाविरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर जिल्ह्यातील नागरिकांसाठी  शनिवारी दि. १३ मे रोजी दिवसभर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिबिरात ते बोलत होते. सकाळी शिबिराचे उदघाटन समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. डी. एस. कट्यारे, समाजकल्याण विभागाचे लिपिक अरुण वाणी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे व विश्वजीत चौधरी उपस्थित होते. उदघाटन मंत्राद्वारे अग्नी प्रज्वलित करून करण्यात आले.

 

प्रस्तावनेतून शिबीर समन्वयक जितेंद्र धनगर यांनी शिबिर घेण्यामागील भूमिका विशद केली. देशभरात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर फोफावल्या असून त्याच्या निर्मूलनासाठी अंनिस कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे आहे. चमत्कार सादरीकरण शिबिरातून शिकून ग्रामीण भागात जनजागृती करता येईल अशी प्रतिक्रिया डॉ. राकेश चौधरी यांनी व्यक्त केली. यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याविषयी सविस्तर माहिती अंनिसचे कायदाविषयक सल्लागार ऍड. भरत गुजर यांनी दिली.

 

चमत्कारांमागील वैज्ञानिक दृष्टिकोन व हातचलाखी याबद्दल प्रा. कट्यारे यांनी माहिती दिली. आपण विचार न करता, बुद्धी न वापरता बुवांच्या म्हणण्याला सहज बळी पडतो. चमत्कारांच्या कथा खोट्या असतात. त्याला आव्हान दिले गेले पाहिजे. आता तर शासनाने विविध विभागही त्यासाठी सुरु केले आहे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी प्रा. कट्यारे यांचेसह रवींद्र चौधरी, प्रल्हाद बोऱ्हाडे, भीमराव दाभाडे यांनी विविध चमत्कार करून त्यामागील सादरीकरण करून दाखविले.

 

यात हवेतून पैसे काढून दाखविणे, गडूतून भूत काढणे, पाण्याचा दिवा पेटविणे, रिकाम्या हातातून कुंकू काढणे, दोरीतील गाठ गायब करणे, कागदावर भूत आणून ते जाळून दाखविणे, मूर्ती दूध पिणे, अंगात येऊन जळता कापूर खाणे, मिडब्रेन भांडाफोड, कर्णपिशाच्च भूत, रिकाम्या तांब्यातून पाणी काढणे आदी चमत्कार दाखविण्यात आले. सहभागींनी देखील प्रात्यक्षिक करून घेत प्रशिक्षण घेतले.

 

शिबिराला समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी शहर कार्याध्यक्ष कल्पना चौधरी, शाखा प्रधान सचिव गुरुप्रसाद पाटील, प्रा. कल्पना भारंबे, शिरीष चौधरी, ऍड. डी. एस. भालेराव, रमेश गायकवाड यांचेसह अंनिसचे कार्यकर्ते, तालुका समन्वयक, कार्यालयीन कर्मचारी, समतादूत आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content