जळगाव, प्रतिनिधी । पक्षाच्या कार्यकर्त्याला “कढीपत्ता” नका बनवू म्हणजेच भाजी बनवताना सगळ्यात आधी आत आणि जेवण करताना सगळ्यात आधी बाहेर अशी वागणूक देऊ नका. घराणेशाहीला थारा न देता नव्या तरुण सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषद निवडणुकीमध्ये संधी द्या अशी मागणी एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आगामी २१ मे रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्ये ९ पैकी २ जागा ९ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. या निवडणुकीत निष्ठावान, प्रामाणिक व पक्षाच्या विचाराने प्रभावित झालेले कार्यकर्ते आयुष्यभर पक्षाचे निष्ठेने काम करतात त्यांना तिकीट देण्यात यावे. निवडणुकीत तिकीट देण्याची वेळ येते, तेव्हा मात्र पक्षातील नेते मंत्री, खासदार, आमदार, यांच्या कुटुंबियांनाच संधी दिली जाते. तेव्हा मात्र पक्षाला तळमळीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवण येत नाही. राजकारणात काँग्रेस पक्ष सर्वात जुना असून आधीपासूनच पक्षावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. अशातच दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या निवडणुकीमध्ये तिकिटे हे नेत्यांच्या घरातच दिली जातात. राजकीय वाटचाल चालवायला एखादा सक्षम कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नव्हे तर नेते आपला मुलगा-मुलगी नातेवाईक निवडू लागले आहेत. निवडणुका जवळ आल्या की घराणेशाही आणखीनच होते. त्यामुळे अशा सर्व पद्धती आता कुठेतरी थांबविणे जरूरीचे झाले असून प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यास तिकीट मिळावे अशी मागणी केली आहे. नव्या तरुण चेहऱ्यांना मिळालेल्या पक्षातील संधी बघून त्यापासून इतरही तरुण आदर्श घेऊन पक्षाच्या संघटनेच्या जडणघडणीसाठी मोठ्या प्रमाणात तरुण पक्षाला जुळतील व पक्ष संघटना वाढण्यास मदत होईल असे मत श्री. मराठे यांनी व्यक्त केले आहे.