जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या ४ दुचाकी, सोन्याचे दागिने, टिव्ही, संगणक संचासह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव शहरातील वाढत्या घरफोडी आणि दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुढे यांच्या सुचनेनुसार गुन्ह्याचा उकल करण्याच्या सुचना देण्यात आल्या. घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगार हा जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, वसंत लिंगायत, पोहेकॉ गोरखनाथ बागुल, रविंद्र पाटील, परेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दिपककुमार शिंदे, राजेंद्र पवार, प्रमोद ठाकूर यांनी २७ मे रोजी शिवकॉलनी परिसरात छापा टाकून संशयित आरोपी निरज देविप्रसाद शर्मा रा. फरकाबाद उत्तरप्रदेश याला ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातील खोटे नगर, मुक्ताईनगर, मानराज पार्क परिसर, पिंप्राळा परिसरात घरफोड्या आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपीने एकुण १३ गुन्ह्यातील कबुली दिली. याप्रकरणी सोमवारी ३० मे रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे