जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील मंगलपूरी येथे घरघुती वादावरून पत्नीला बेदम मारहाण करून लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी १२ मार्च रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल अशोक गोसावी रा. मंगलपूरी, रामेश्वर कॉलनी, जळगाव हे पत्नी रविना गोसावी यांच्यासह वास्तव्याला आहे. ११ मार्च रोजी सायंकाळी घरी असतांना राहूल आणि त्याची पत्नी रविना यांच्यात कौटुंबिक वाद झाला. यावादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, राहूलचा राग अनावर झाल्याने त्याने घरातील लोखंडी रॉड पत्नी रविनाच्या डोक्यात टाकला. या हाणामारीत ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर जखमीवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी १२ मार्च रोजी रात्री उशीरा पत्नी रविना गोसावी यांनी पती राहूल गोसावी यांच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक पवार करीत आहे.