जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा सारख्या घनदाट वस्तीच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे रात्री आलेल्या रिपोर्टमधून दिसून आले असून यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. या परिसरातील नागरिक फिजीकल डिस्टन्सींगसह अन्य नियमांचे पालन करत नसल्याचे आधीच दिसून आले असून यातच येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
२४ मे रोजी तांबापुरा परिसरातील एका ४५ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या आप्तेष्टांनी कोविड रूग्णालयावर आरोप केले होते. डॉक्टरांच्या बेपर्वाईने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून कोविड रूग्णालय परिसरात गोंधळ घातला होता. यानंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रसंगी मोठा समुदाय उपस्थित होता. काल आलेल्या रिपोर्टमध्ये हा व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
संबंधीत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तसेच आधी हा रूग्ण अनेकांच्या संपर्कात आला होता. त्याचे वास्तव्य असणारा तांबापुरा परिसर हा दाट लोकवस्तीचा असल्याने आता या व्यक्तीच्या संपर्कातील आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या परिसरात अनेक घरे दाटीवाटीने असल्याने आता येथे कोरोनाचा संसर्ग उफाळण्याची भिती आहे. या अनुषंगाने काल रात्री उशीरा हा भाग सील करण्याची तयारी सुरू झाली होती. तर आज मृताच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.