…या तर गंजलेल्या तोफा ! : शिवसेनेची भाजपवर टीका

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सरकार पडणार असे गंजलेल्या तोफांमधून आवाज काढावेत असे मनसुबे कुणी काढू नयेत, जुन्या तोफा म्हणजे हवा-पाण्याची नळकांडीच ठरतात असे नमूद करत शिवसेनेने आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सध्या मुंबईतील राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर देवेंद्र फडणवीस, शरद पवार, संजय राऊत आदींनीही राज्यपालांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात काही तरी शिजत असल्याचे जाणवत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात आज यावरच भाष्य करण्यात आले आहे. राजभवनातील तोफा (गंजलेल्या) या शीर्षकाखालील अग्रलेखात जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, राज्यपालांना विरोधी पक्षाचे नेते भेटले, तसे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत भेटले. महाराष्ट्रातील स्थितीविषयी राज्यपालांशी चर्चा करणे, माहिती घेणे म्हणजे राजभवनाच्या पोटात काही खळबळ सुरू आहे असे नाही. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्यकारभार चालला आहे की नाही हे पाहण्याचे कार्य भारतीय घटनेने राज्यपालांवर सोपविले आहे. राज्यपालांवरील जबाबदारीबाबत घटनेचा स्पष्ट आदेश आहे. राज्यपालांनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना फार मोठी विैंमत चुकवावी लागते असे इतिहासाचे दाखले आहेत. मुळात महाराष्ट्राचे सरकार हे घटनेनुसार काम करीत आहे. ठाकरे सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. या सरकारच्या स्थिरतेसंदर्भात कोणत्याही अडचणी दिसत नाहीत. असे असताना राजभवनात काहीतरी वेगळे जंतरमंतर चालले आहे अशा अफवा पसरवणारे राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्‍न निर्माण करीत आहेत.

यात पुढे म्हटले आहे की, सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. विरोधासाठी विरोध हेच धोरण आहे व त्यासाठी राज्यपालांनी विरोधकांना खडेबोल सुनवायला हवेत. महाराष्ट्राचे राज्यपाल या बाबतीत सडेतोड आहेत. त्यांना राज्यातले प्रशासकीय नेमणुकांचे अधिकार हवे आहेत. ते शेवटी देशाची घटना दुरुस्त करूनच मिळवावे लागतील, पण सध्या जे अधिकार त्यांच्या हाती आहेत, त्यांचा वापर करून त्यांनी राज्य अस्थिर करू पाहणार्या विरोधकांना राजभवनावर बोलवायला हवे आणि त्यांचे कान उपटायला हवेत. राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही. दोनेक वर्षांपूर्वी मुंबईच्या राजभवनाखाली एक ब्रिटिशकालीन भुयार सापडले. त्यात काही जुन्या गंजलेल्या तोफा वगैरे सापडल्याचे तेव्हा सांगितले गेले. महाराष्ट्रातील सरकार पडणार असे आवाज त्या गंजलेल्या तोफांतून काढावेत असे मनसुबे कोणी रचू नयेत. जुन्या तोफा म्हणजे हवा-पाण्याची नळकांडीच ठरतात. राजभवनातील हवा-पाणी गढूळ होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असे या अगलेखात म्हटले आहे.

Protected Content