जळगाव, प्रतिनिधी । येथील महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मी कंस्ट्रक्शन लिमिटेड, औरंगाबाद यांनी संगनमताने घनकचरा व्यवस्थापन निधीमध्ये भ्रष्टाचार केलेला असून याबाबतची चौकशी व्हावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना महानगर पालिकेतील स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी शुक्रवारी ६ रोजी निवेदन दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, विलास भदाणे उपस्थित होते. प्रशांत नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्राप्त निधीच्या डीपीआरमध्ये वाढीव बाब म्हणून समाविष्ट केलेले नसतांना तसेच निविदा न राबविता ९० लाखांची कामे महापालिकेने परस्पर उरकली असल्याचा गंभीर आरोप केला होता. यात आयुक्त आणि ठेकेदार यांनी संगनमत करून शासनाच्या लाखो रुपये निधीचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. याबाबतची संपूर्ण कागदपत्रे पत्रकार परिषदेत प्रशांत नाईक यांनी सादर केली होती. या सर्व प्रकरणांमध्ये “निरी” या संस्थेकडे देखील प्रशांत नाईक यांनी तक्रार ऑनलाईन दाखल केली आहे.
शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून चौकशी करण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पाटील यांना लवकरच चौकशीचे आदेश देणार असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात आता पूर्णतः पाठपुरावा करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी यासाठी तसेच ठेकेदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद यांना काळ्या यादीत समाविष्ट करायसाठी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सांगितले आहे.