जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सद्यास्थितीत महाराष्ट्रासह जळगाव शहरात गोवर या साथीच्या आजाराचे रूग्ण आढळुन आलेले आहेत. या साथरोगाबाबत जनजागृतीसाठी सर्व धर्मगुरूंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग गुंतागुंत होऊ शकते. त्या अनुषंगाने जळगाव महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाकडुन जळगाव शहरात घरोघरी जाऊन लहान बाळांचे सर्वेक्षणाचे काम सुरू केलेले आहे. सर्वेक्षणात आतापर्यंत शहरात गोवर साथीचे १२ रुग्ण आढळुन आलेले आहेत. सदर बाळांना तात्काळ व्हिटामिन एचे दोन डोस देण्यात आलेले असुन त्यांची प्रकृती चांगली आहे.
गोवर साथीच्या आजाराबाबत जनजागृती व्हावी म्हणुन आयुक्त देविदास पवार मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व धर्मीय धर्मगुरुंची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील फादर किशोर विधाटे, भंतेजी एन. सुगतवंत महाथेरोजी, जमाते इस्लामी हिंद अध्यक्ष सुहेल आमीर व शहरातील विविध मस्जीदींचे मुफ्ती आणि इमाम तसेच, भवानी मंदिराचे महेश त्रिपाठी, हभप दादामहाराज जोशी, उर्दु शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र सोनवणे तसेच एम.आय.एम.चे नगरसेवक रियाज बागवान, सैईदा युसुफ शेख, अक्रम देशमुख,नगरसेवक सुरेश सोनवणे, तसेच उपायुक्तचंद्रकांत वानखेडे, सहा. आयुक्त सुनिल गोराणे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नांदापुरकर तसेच दवाखाना विभागाच्या डॉ. मनिषा उगले, डॉ. संजय पाटील, सर्व डॉक्टर्स, परिचारीका हे उपस्थित होते.
याबैठकीत गोवर साथ रोग विषाणु रूग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना श्वसन संस्थेतुन शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याच्या लक्षणांना जसे की ताप, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे नंतर सर्व अंगावर पुरळ येणे. गोवरच्या रूग्णास न्युमोनिया, अतिसार, मेंदुज्वर या आजारामुळे योग्य उपचार न मिळाल्यास रूग्णाचा मृत्यु होऊ शकतो. परंतू शहरातील काही भागांमध्ये लसीकरणाबाबत नकार आढळुन येत आहे. तसेच शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू असुन दवाखाना विभागातील परिचारीका व आशा सेविका कर्मचारी यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे जेणेकरून बालकांचे लसीकरण पुर्ण करण्यास मदत होईल.
गोवर साथ रोगाचा उद्रेक इतर भागात होणार नाही. लहान बालकांना गोवर लसीकरणाचा पहिला डोस ९ महिने ते १२ महिने, तसेच दुसरा डोस १६ महिने ते २४ महिने तसेच सोबत व्हिटामिन एचा डोस दिला जात असतो. नागरीकांना आवाहन करण्यात येते की ज्या बालकांना अद्यापपावेतो गोवर, रूबेला डोस दिलेला नसल्यास बालकांना गोवर रूबेला डोस लवकरात लवकर देण्यात यावा अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नांदापुरकर यांनी दिली. गोवर साथ रोगाची लक्षणे व त्यावरील उपचार या संदर्भात सदर बैठकीमध्ये माहिती देण्यात आली. तसेच जळगाव शहरातील नागरीकांना या संदर्भात जनजागृती व्हावी म्हणुन सर्व धर्मांचे धर्मगुरु यांना प्रबोधन करणेसाठी महानगरपालिकेतर्फे विनंती करण्यात आली. या बैठकीत फादर किशोरजी विधाटे, भंतेजी एन. सुगतवंत महाथेरोजी, मौलाना जमाते इस्लामी हिंद अध्यक्ष सुहेल आमीर, हभप दादामहाराज जोशी, भवानी मंदिराचे महेशजी त्रिपाठी, एम. आय.एम.चे नगरसेवक रियाज बागवान व विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे विचार मांडले आणि गोवर साथ रोगावर प्रतिबंध कसा करता येईल याबाबत शहरातील नागरीकांना प्रबोधन करण्याची ग्वाही दिली.