गुजरातेत भाजपच्या मोफत रेमडिसिवीर वाटपाचे दरेकर , भातखळकरांकडून समर्थन

 

मुंबई : वृत्तसंस्था । गुजरातेत भाजपच्या मोफत रेमडिसिवीर वाटपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण  दरेकर व आमदार अतुल  भातखळकरांकडून समर्थन  करण्यात आले  आहे . हे समर्थन करताना त्यांनी महाराष्ट्र सरकार दिशाहीन झाल्याचा ठपका ठेवला आहे

 

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या थैमान घातलं आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन बाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. देशभरात लसीकरण मोहिमेत लसींच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी अडथळा निर्माण होताना दिसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रूग्णांना आवश्यक असलेलं रेमडिसिवीर इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने व या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर येत असल्याने नागरिकांमधून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र या इंजेक्शनचं मोफत वाटप सुरू असल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपावर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

 

“राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय, हे पाहण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे!… राज्यात आरोग्य व्यवस्थेत असलेल्या कमतरतेवर नवाब मलिक यांनी बोलावं.” असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

 

 

‘देशात रेमडिसिवीर इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे आणि सूरतच्या भाजपा ऑफिसमध्ये मोफत रेमडिसिवीर इंजेक्शन वाटलं जात आहे. भाजपाचं राजकारण नाही तर काय सुरु आहे?’, नवाब मलिक यांनी असा प्रश्न ट्वीट करत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना टॅग केलं होत .

 

दरेकर म्हणाले की, “नवाब मलिक यांचे हे तथ्यहीन बोलणं आहे. उलट ते मोफत रेमडेसिवीर देत आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, ते त्यांच्या राज्याची काळजी घेत आहेत. तुम्ही जाऊन गुजरात किंवा कर्नाटकची काळजी घेणार आहात का? इथल्या व्यवस्था उभं करणं, आपली जबाबदारी आहे. केवळ माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून चालणार नाही, तर त्या कुटुंबासाठी जबाबदारीने सरकार म्हणून वागलं पाहिजे. जे बेजबाबदारपणे नवाब मलिक यांच्या सारखे मंत्री बोलताना दिसत आहेत, मला वाटतं आहे त्या व्यवस्था मजबूत कराव्यात.दुसऱ्याच्या ताटात काय वाढलंय, हे पाहण्यापेक्षा आपलं ताट रिकामं आहे! आज लोकांना मदतीची गरज आहे. आज रेमडेसिवीर नाही, व्हेंटिलेटर्स नाही, ऑक्सिजनचा साठा नाही यावर बोललं पाहिजे. केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यात जरा कमी वेळ घालवून, नियोजनात व व्यस्थेत वेळ घालवावा अशाप्रकारची माझी यांना विनंती राहील.”

 

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे, “रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय? सरकार म्हणून तुम्ही तोडपाणी शिवाय काहीच करत नाही, दुसरा काही काम करतोय त्याचे तरी कौतुक करा.” असं भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

Protected Content