अहमदाबाद : वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर मोदी यांनी गुजरातसाठी १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.
देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोकण किनारपट्टीशी समांतर गेलेल्या तौते चक्रीवादळामुळे किनारी भागात वादळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमधला वीजपुरवठा, रस्तेवाहतूक विस्कळीत झाली. मात्र, गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सीमाभागातल्या गावांना बसला आहे. चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरू झाला, तेव्हा किनारी भागातल्या एकूण २४०० गावांमधला वीजपुरवठा खंडित झाला . वीजेचे हजारो खांब उन्मळून पडले १६० रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तब्बल ४० हजार झाडं उन्मळून पडली १६ हजार ५०० घरांचं नुकसान झालं किनारी भागातून तब्बल २ लाख नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं होतं.