जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीची बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोघांना शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून २० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजा परिसरात मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील राहणारे दोन जण हे गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या, एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर कारवाई करत संशयित आरोपी अक्षय प्रकाश घारू (वय-२१) आणि नितीन देवी दयाल सालवे (वय-२५) दोन्ही रा. शिवाजीनगर, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्तूल हस्तगत केली आहे. पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे.