जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरिविठ्ठल नगरातून गाय चोरून नेत असतांना पकडल्याने स्कॉर्पीओ वाहन एकाच्या अंगावर नेवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २० डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्जून विठ्ठल बारी (वय-५५) रा. हरीविठ्ठल नगर रोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पशूपालन करून आपला उदरनिर्वाह करत असतो. ३ नोव्हेंबर रात्री ११ ते ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरटे हे स्कॉर्पीओ वाहन क्रमांक (एमएच १२ बीव्ही ९४१५) ने जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील महादेव मंदीराजवळ आले. त्याठिकाणी अर्जून बारी यांच्या मालकीची गाय बांधलेले होती. अज्ञात चोरट्यांनी गायीला वाहनातून चोरून नेत होते. हा प्रकार अर्जून बारी याच्या लक्षात आल्याने त्याने चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान, खोटे नगर स्टॉपच्या पुढे चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करून अडविण्याचा प्रयत्न केला असता चारचाकी वाहनाने अर्जून बारी याच्या अंगावर नेत दुभाजक आणि चारचाकी वाहन मध्ये दाबण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मंगळवारी २० डिसेंबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अर्जून बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.