जळगाव प्रतिनिधी । महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे बा-बापू १५० व्या जयंती वर्षनिमित्त ‘गांधी नाकारायचाय पण कसा ?’ या विषयावरील अभिवाचनाने उपस्थितांना अंतर्मुख केले.
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे बा-बापू १५० व्या जयंती वर्षनिमित्त ‘गांधी नाकारायचाय पण कसा ?’ या विषयावर अभिवाचन करण्यात आले. गांधीतीर्थच्या कस्तुरबा सभागृहात गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन, डॉ. भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना. धों. महानोर उपस्थित होते. महात्मा गांधींना विविध आरोपांच्या पिंजर्यात उभे करून त्यांना नाकारायचा यासाठी दिशाभूल करणारे अनेक मात्र वस्तुस्थितीला धरून इतिहासातील संदर्भ तपासले असता गांधीजींचे विचार त्यांच्याजवळ घेऊन जातात. गांधीजींचे विचार हे कसे सत्य, अहिंसेला धरून काळानुरूप लागू होतात. गांधीजींविषयीचा समज-गैरसमज विनोदाच्या शैलीने हळूहळू अधोरेखित होत जातात. अभिवाचन रंगकर्मी शंभू पाटील यांनी लिहीले असून त्यांनीच दिग्दर्शनही केले. मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील, विजय जैन यांनी अभिनय केला. तर पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर यांनी दिले. वसंत गायकवाड, विशाल कुलकर्णी यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले.
आरंभी मान्यवरांच्याहस्ते गांधीतीर्थ महात्माचे यथार्थ दर्शन डॉक्युमेंट्रीचे प्रकाशन करण्यात आले. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे संपादक शेखर पाटील, कार्यकारी संपादक विजय वाघमारे, वृत्त संपादक विवेक उपासनी व व्हिडीओ एडिटर शिरीष शिरसाळे आदी याप्रसंगी उपस्थित होते. स्मिता गुप्ता यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन पाळला गेला. यानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, जैन हिल्स, जैन अॅग्री पार्क, जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये सकाळी ११ वाजता दोन मिनटांचे मौन पाळून महात्मा गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संध्याकाळी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली.