गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिरास आरंभ

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नव्या पिढीत अहिंसा, सहअस्तित्व, संरक्षण और सर्व जीवांच्याप्रती आत्मियतेची भावना वृद्धींगत व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे दर वर्षी गांधी तीर्थ येथे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबीर घेतले जाते. ह्या शिबिराचे औपचारिक उद्घाटन 21 रोजी झाले.

यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन आयंगार, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, रिसर्च डीन गीता धरमपाल, डॉ आश्वीन झाला यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले. भारतातील 56 व नेपाळ येथील 4 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. त्यात विविध प्रकारचे सत्र होणार आहेत. या शिबिराचा समारोप 1 जानेवारी 2023 ला होणार आहे.

सध्याच्या परिस्थिती संदर्भात गांधीजींच्या विचारांच्या प्रासंगिकतेच्या आधारे नेतृत्व तयार करणे या प्रमुख उद्देशाने या शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नव्या पिढीतील युवकांना शांतता दूत बनवणे, व्यक्तिमत्व घडवून त्याच्या ज्ञान व परिश्रमाने समाज घडवणे, चारित्र्य घडवून राष्ट्र निर्माण करणे, पर्यावरण आणि विकासावर आधारित नेतृत्वाची निर्मिती करणे याच बरोबर तरुणांना अहिंसक जीवनशैलीवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणे, सार्वजनिक प्रशासन आणि सार्वजनिक धोरणावर आधारित नेतृत्वाची निर्मिती, संघटनेची भावना निर्माण करणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि शासन प्रक्रियेत त्यांचे नेतृत्व निर्माण करणे इत्यादि या शिबिराचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलननाने शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले. डॉ. सुदर्शन आयंगार, डीन गीता धरमपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, सौ. अंबिका जैन, डॉ. झाला, गिरीश कुळकर्णी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिती शहा यांनी केले.

या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना क्षेत्र भेट, प्रशिक्षण / कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य भूमिका, गट असाइनमेंट, ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव, प्रवास, संप्रेषण, समुदाय संवाद, व्याख्यान, माध्यमांचे विविध प्रकार प्रशिक्षणासाठी उपयोगात आणले जातात. या गांधीयन लिडरशीप शिबिरात सहभागी झालेल्यांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. नेतृत्व क्षमता वाढीसाठी युवा शिबिरामध्ये विशेषत: एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी संघ, राज्यशास्त्राचे विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि क्षेत्रीय स्तरावर युवा शाखा हाताळणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.

गांधी रिसर्च फाउंडेशन ही जळगाव, महाराष्ट्र येथे स्थित एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था नवीन पिढीला अहिंसा, सहअस्तित्व इत्यादिंची शिकवण देते. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे स्थानिक आणि जागतिक स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. उदाहरणार्थ, विविध अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, क्षेत्रात मोठे काम केले आहे. ग्रामविकास, ग्रामीण रोजगार, प्रशिक्षण यासारखे अनेक लोकाभिमुख कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे केले जाते. ‘खोज गांधीजीकी’ जगातील सर्वात मोठ्या व पहिल्या क्रमांकाचे ऑडियो गाइडेड व मल्टीमीडिया संग्रहालय म्हणून लौकीक मिळविलेला आहे. त्या माध्यमातून गांधीजींच्या जीवन कार्याचा अभिनव रितीने या संग्रहालयास भेट देणाऱ्यांना परिचय होत असतो. वर्षातून देश- विदेशातील हजारो व्यक्ती खोज गांधीजीकी या संग्रहालयास भेट देतात. युवकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातील एक भाग असलेल्या या राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिराकडे पाहिले जाते.

Protected Content