भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात  

 

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात साधारण पाच वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये काही नागरिकांनी धावण्याचा एकत्रित सराव करायला सुरुवात केली. त्यानंतर हे धावपटू नियमितपणे धावण्याचा सराव करून देशातील विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवू लागले. त्यांपैकी प्रा. प्रवीण फालक यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याची रितसर मान्यता धर्मादाय आयुक्त, जळगाव यांच्याकडून घेण्यात आली. 18 डिसेंबर रोजी ही मान्यता मिळाली त्यामुळे हा दिवस धावपटू, सायकलपटूंतर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावेळी साधारणतः शंभरहून अधिक धावपटूंनी एकत्रित 10 किमी धावून वर्धापन दिन साजरा केला. सुरुवातीस वार्मअप घेण्यात आले. त्यानंतर शहरातील जामनेर रोड व आरपीडी रोडवर 10 किमी धावून धावपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परतले. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली.

याप्रसंगी सर्व धावपटूंतर्फे डॉ. तुषार पाटील यांनी प्रा. प्रवीण फालक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन छोटेखानी सत्कार केला. त्याचप्रमाणे लेडीज रनच्या समन्वयिका डॉ. नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांचा देखील डॉ. स्वाती फालक व पूनम भंगाळे या महिला धावपटूंतर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रा. प्रवीण फालक यांनी सर्व धावपटूंना मार्गदर्शन केले व नियमित धावून आपले आरोग्य निरोगी रहावे व त्याचप्रमाणे प्रत्येक धावपटूने किमान दोन नागरिकांना प्रोत्साहित करून त्यांचे आरोग्य संवर्धनासाठी मदत करावी असे आवाहन देखील केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ.चारुलता पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके, छोटू गवळी व रिजवान शेख यांनी सहकार्य केले.

Protected Content