गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात १५ जूनला रक्तरंजित झटापट झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता. मात्र याच भागातून आता चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेल्याचे वृत्त समोर आले आहे.

 

‘द हिंदू’ ने दिलेल्या वृत्तात म्हटलेय की, गलवान खोऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे. १५ जूनला झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्य आणखी पुढे सरकले होते. चिनी सैन्य तैनात असलेले भाग भारताच्या दृष्टीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा समजली जाते. त्यानंतर भारतानेदेखील या भागातील फौजफाटा वाढवला. यानंतर ३० जूनला दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची बैठक झाली. त्यानंतर चिनी सैन्य मागे हटले की नाही, याची पडताळणी करण्यासाठी रविवारी एक सर्वेक्षण करण्यात आले. ‘गलवान खोऱ्यातील झटापट झालेल्या भागापासून चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे घेतले आहे. या भागात उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामं हटवण्याचे काम दोन्ही देशांच्या सैनिकांकडून सुरू आहे. दरम्यान, चीनी वाहने अजूनही गलवान नदी क्षेत्रातील सखोल भागात उपस्थित आहेत. भारतीय सैन्य सावधगिरीने परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

Protected Content