गरीबांच्या वस्तीतून श्रीराम मंदिर निधी संकलनास प्रारंभ (व्हिडीओ)

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरातील गरीबांच्या वस्तीतून अयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराच्या निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सुभाष चंद्र बोस,भगवान रामदेव बाबा, महर्षी व्यास यांच्या पुतळ्यास माल्यार्पण अर्पण तसेच वंदन करून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलन अभियानास फैजपुर शहरात आज सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली.

निधी संकलन समितीचे जिल्हाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज तसेच निधी संकलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, रामभक्त नागरिक यांच्या उपस्थितीत फैजपूर शहरातील आंबेडकर नगर, रामदेव बाबा नगर, कोळीवाडा, भिलवाडी, रोहिदास नगर या बेघर वस्तीत तसेच दीनदुबळ्या, गरीब, निराधार असलेल्या भागात श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली.

समाजाच्या शेवटच्या घटकाचा मंदिर निर्माणासाठी एक रुपया सुद्धा यावेळी महत्त्वाचा आहे असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. वस्तीत शेकडो हातावर पोट भरणारे मजूर, सफाई कामगार, वीटभट्टी कामगार, केळी वाहतूक महिला, लोहार कुटुंब या राम भक्तांनी आपल्या यथाशक्ति शंभर रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत देणगी देऊन आनंद व्यक्त केला. वाल्मिक समाजाचे नगरपालिकेत असलेले सफाई कामगारांनी एकवीस हजार रुपयाचा निधी मंदिर निर्माणासाठी देणगी म्हणून यावेळी जाहीर केला.

गरीब दिनदुबळ्या मजूर वर्गाच्या झोपडीत महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचे पाय लागले हाच आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. या आनंदाच्या भरात घरात जवळ असलेले पैसे प्रत्येक जण आणून देऊन आमचा हा खारीचा वाटा स्वीकारावा अशी विनंती करत होता. हे दृश्य पाहून, ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. एक सुंदर अशी सुरुवात श्री राम लल्ला यांच्या मंदिर निर्माणासाठी साठी फैजपुर शहरातून करण्यात आली. पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. लोकेश कोल्हे (फैजपुर नगर अभियान प्रमुख), युवराज किरंगे (निधि प्रमुख), दिपक पाटील (सह अभियाना प्रमुख), हर्षल महाजन (सह निधि प्रमुख), रितेश चौधरी, नीरज झोपे, संजय सराफ, विनोद कोल्हे, मोहित पाठक, सूरज गाजरे, चेतन पाटील आदि रामसेना परिश्रम घेत आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/900372060704330

Protected Content