मुंबई प्रतिनिधी । अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांच्या अहमदाबाद येथील दौर्यावर आणि दारिद्य लपविण्याच्या आट्यापिट्यावर आज शिवसेनेने हल्लाबोल करत या ‘गरिबी छुपाव’साठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे का ? असा खोचक सवाल केला आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप हे आपल्या भारत दौर्यात अहमदाबाद शहरात जात असून यासाठी पैशांची मोठ्या प्रमाणात नासाडी करण्यात येत आहे. यावर शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामना मधून भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे बादशहा हे येत्या आठवड्यात हिंदुस्थान भेटीवर येत आहेत. त्यामुळे आपल्या देशात मोठीच लगीनघाई सुरू आहे. त्याबद्दल खुद्द प्रे. ट्रम्प, त्यांच्या पत्नी उत्साहित आहेत. त्यांच्या स्वागताची हिंदुस्थानात किंवा प्रत्यक्ष दिल्लीत किती लगबग सुरू आहे ते माहीत नाही, पण मोदी-शहा यांच्या गुजरातमध्ये ट्रम्प यांचे आगमन सर्वप्रथम होत असल्याने तेथे मात्र मोठीच लगबग सुरू झाली आहे. त्या लगबगीस काही नतद्रष्टांनी आक्षेप घेतला आह़े ट्रम्प यांना आधी गुजरातमध्येच का नेले जात आहे या प्रश्नाचे खरे उत्तर मिळणे कठीण आहे. मोदी यांनी ट्रम्प यांना आधी गुजरातमध्ये नेण्याचे ठरवले व त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.
यात पुढे नमूद केले आहे की, आम्ही असे वाचतोय की, प्रे. ट्रम्प हे फक्त तीन तासांच्या भेटीवर येत आहेत व त्यासाठी शंभर कोटींवर खर्च सरकारी तिजोरीतून होत आहे. १७ रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे, नवे रस्ते बांधले जात आहेत, पण सगळयात गंमत अशी की, प्रे. ट्रम्प यांना अहमदाबादच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या बकाल गरीबांच्या झोपडयांचे दर्शन होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गडकोट किल्ल्यास तटबंदी असावी तशा भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. ट्रम्प यांच्या नजरेतून गुजरातची गरिबी, झोपडया सुटाव्यात यासाठी ही राष्ट्रीय योजना हाती घेतल्याची टीका सुरू आहे. ट्रम्प यांना देशाची दुसरी बाजू दिसू नये यासाठी काय हा खटाटोप? प्रश्न इतकाच आहे, श्री. मोदी हे सगळ्यात मोठे विकासपुरुष आहेत. त्यांच्या आधी या देशात कोणी विकास केला नाही व बहुधा नंतरही कोणी करणार नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आली आहे व गुजरातमध्ये फिट्टमफाट म्हणून केम छो ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही सरळ राजकीय योजना आहे. ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे? प्रे. ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्टया लपविणाऱया भिंती पाडणार काय? हे प्रश्न आहेत. मागे गरिबी हटाव या घोषणेवरून बरीच टिंगलटवाळी झाली होती. त्याच घोषणेचे रूपांतर आता गरिबी छुपाव या योजनेत झालेले दिसते. नव्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे काय? संपूर्ण देशात अशा भिंती उभारण्यासाठी अमेरिका हिंदुस्थानला कर्ज देणार आहे काय? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.