रावेर, प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सव नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळून शांततेत साजरा करावा कायदा सु-व्यवस्थेचा सर्वांनी सन्मान करावा असे आवाहन नासिक पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी रावेरच्या शांतता कमेटीच्या बैठकीत केले.
ते पुढे म्हणाले की, निअपराधारांचा सन्मान तर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात पोलिस प्रशासन सक्षम आहे. प्रतिष्ठीत नागरीकांनी निर्भय होऊन शांतता टीकवण्यासाठी समोर यावे व आपले विचार समाजा समोर ठेवावे. युवकांनी विनाकारण कोणत्याही भानगडीत पडू नये, त्यांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी यावेळी दिला. पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे म्हणाले की, सूजमल-सुखलम असलेला रावेर तालुक्यातील युवकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासुन लांब राहावे. कुठल्याही चुकीच्या कामांमध्ये सहभाग घेऊ नये, यासाठी पालकांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. त्यांना चांगले शिक्षण देऊन समाजहीताचे कार्य त्यांच्या हातुन करावे तसेच पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेल्या सोबत फक्त पाच ते सहा जणांना पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश द्यावा. जास्त गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असे प्रतिपादन पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे शांतता बैठकीत केले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावांड, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, तहसीलदार महेश पवार, पोलिस निरिक्षक कैलास नागरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, नगरसेवक प्रल्हाद महाजन, आसिफ मेंबर, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, सहायक पोलिस निरिक्षक स्वप्निल उनवणे, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, अशोक शिंदे, अॅॅड. योगेश गजरे, सुधाकर महाजन आदी शांतता कमीटीचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान आयोजित बैठकीत नागरीकांकडून पोलिस प्रशासनाबद्दल काही सूचना मागवण्यात आल्या असता नागरीकांनी पुढील अपेक्षा व्यक्त केल्या. पैसे घेऊन आरोपी सोडले जाऊ नये, शांततेसाठी जनतेत जाऊन बैठका घ्याव्या,निअपराधांवर कारवाई करू नये ,शांतता प्रस्तापीत करणा-यांना आरोपी करू नये ,शहरात पोलिसांनी जास्त सक्रीय रहावे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे ऍक्टीव्ह करावे आदी अपेक्षा नागरीकांनी पोलिसांकडून व्यक्त केल्या.