नागपुर (वृत्तसंस्था) गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या पोलिसांवर भुसूरूंग स्फोटाद्वारे हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.
भामरागड तालुक्यातील हेडरी पोलिस मदत केंद्र हद्दीतील बोडमेटा जंगल परिसरात पोलिस आणि सीआरपीएफ बटालियन १९१ कंपनीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. याच दरम्यान, नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस जवानांना ठार मारण्यासाठी मोठा कट रचला होता. परंतू पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. तेव्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. मात्र, जवानांनी सुध्दा नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन नक्षलवाद्यांचा घातपाताचा हा कट उधळवून लावला. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता नक्षलवाद्यांनी आणखी एक भुसुरुंग पेरून ठेवल्याचे जवानांनी शोधून काढले.