गडचिरोली वृत्तसंस्था । ‘कोरोना’ प्रादुर्भावापासून दूर राहिलेला विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातही ‘कोरोना’चा शिरकाव झाला आहे. तीन जण मुंबई आणि पुण्याहून आले होते. तिघे कोरोनाबाधित असल्याचा अहवाल समोर आला आहे.
एकाच वेळी ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर गडचिरोली जिल्हा ग्रीनमधून ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. मुंबई-पुण्याहून आलेल्या आणि प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्या तिघा नागरिकांची तपासणी केल्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा गावात दोन, तर चामोशीमध्ये एक कोरोनाग्रस्त सापडला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचे एकही लक्षण दिसलेले नाही. संबंधित कोरोनाबाधित व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलवण्यात आले आहे. रुग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सुरु आहे. मुंबईहून प्रवास करताना गडचिरोली जिल्ह्यात एका ट्रकमधून त्यांनी कुरखेडापर्यंत प्रवास केला होता. या ट्रकमध्ये 30 नागरिकांनी प्रवास केला होता. त्यांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे.
जिल्हयातील नागरीकांना आणि बाहेरुन आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आवाहन केले आहे. सिंगला यांनी बारा तालुक्यातील प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. गडचिरोली जिल्हा सोडून वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही रुग्ण सापडले होते.