जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी बुद्रुक येथे जुन्या वादातून एका तरुणावर गावातीलच तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
संदीप पोपट पाटील (वय-२२) व शिवाजी कडुबा पाटील (वय-५०) दोन्ही रा. खेडी ब्रुद्रूक या दोन संशयितांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, धनराज गजानन कोळी हा खाजगी वाहन चालवून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. १६ डिसेंबर रोजी रात्री धनराज कोळी हा परभणी येथून गाडी खाली करून रात्री ११ वाजता जळगावात आला. त्यानंतर खेडी बुद्रुक येथे वाहन त्याच्या घराच्या बाजूला लावून घराकडे जात होता. यादरम्यान जुन्या वादातून भावेश पोपट पाटील, संदीप पोपट पाटील आणि शिवाजी पाटील सर्व रा. खेडी बुद्रुक यांनी धनराज कोळी यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात भावेश पाटील याने धनराजच्या डाव्या हाताच्या दंडावर व पोटाच्या एका बाजूला चाकूने वार केेले. यात धनराज जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमी धनराजच्या जबाबावरुन याप्रकरणी१७ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यात फरार असलेल्या संशयितांबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, जितेंद्र राठोड, समाधान टाहकळे, सचिन मुंडे, यशोधन ढवळे, चालक इम्तियाज खान यांच्या पथकाने गुरुवारी, संदीप पाटील व शिवाजी पाटील या दोन जणांना अटक केली. दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्ती ए. एस. शेख यांनी ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ऍड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. तिसर्या संशयिताचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे, किरण पाटील हे करीत आहे.