जळगाव प्रतिनिधी । मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या गॅसचे टँकर खेडी गावाजवळील वळणावर कलंडल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या टँकरमध्ये ज्वलनशील द्रव्य असल्याने नागरिकांमध्ये काही वेळापर्यंत भीती निर्माण झाली होती. स्फोट तर होणार नाही ना ? अशी चर्चा घटनास्थळी ऐकावयास मिळाली.
याबाबत माहिती अशी की, मुंबईहुन जळगावमार्गे नागरपूरकडे गॅसने भरलेला टँकर (एचएच ४३ वाय ९८०१) आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास महामार्ग क्रमांक ६ वरून भुसावळरोडवरून जात असतांना खेडीजवळील वळणावर टँकरचा जॉईंट तुटल्याने गाडीची मागची भाग रोडवरील लिंबाच्या झाडावर आदळला. सुदैवाने चालक मुनीवर आणि क्लिनर हे बालबाल बचावले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल मोरे, पोकॉ हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी, चालक भुषण सोनार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटना घडल्यानंतर ट्रकचालक मुनीवर हा फरार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती तेव्हा कोसळलेले टँकर उचलण्याचे काम सुरू होते.