जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौर ललीत कोल्हे यांना एलसीबीच्या पथकाने अटक केल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, बांधकाम व्यावसायिक खूबचंद साहित्या यांना गोरजाबाई जिमखान्याजवळ मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागीतल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. तसेच साहित्या यांच्याकडून खंडणी मागीतली होती. १६ जानेवारी २०२० रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील गोरजाबाई जीनखाना येथे साहित्या गेले होते. यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पिस्तुलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण केली. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पाेलिस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जबरदस्तीने वसुली, लबाडीच्या इराद्याने वस्तुची परस्पर विक्री, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माजी महापौर ललीत कोल्हे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होते. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असली तरी कोल्हे हे फरार होते. आज रात्री एलसीबीच्या पथकाने त्यांना रामानंद नगर परिसरातून अटक केली आहे.