जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फटाके फोडण्याच्या कारणावरून शिरसोली नाका येथे तरूणावर चाकू भोसकून करून खून केल्याच्या गुन्ह्यातील फरार संशयित महिलेला एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिरसोली नाका परिसरातील सदगुरू कॉलनीत २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. त्यानंतर मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौर जगदीशसिंग बावरी, सोनुसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. शिरसोली नाका, सदगुरु कॉलनी जळगाव यांनी वाद घातला. यात संतापाच्या भरात मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्या पोटावर चाकूने वार करून खून करत दगडफेक केली. खून झाल्यापासून संशयित आरोपी हे फरार झाले होते. यातील संशयित आरोपी मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना यापुर्वीत अटक केली होती तर संशयित महीला आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी ही फरार होती.
गुन्ह्यातील संशयित आरोपी महिला ही मनमाड येथे लपून असल्याच्या माहितीवरुन गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे व महीला पोकॉ सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता महिला आरोपीस अटक केली आहे. मनमाड शहरातील मोठे गुरुव्दारा भागात ती लपली होती. पोलिस पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली.