मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या आनंदाची बातमी दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला असून २९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे.
29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जातील. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता दर शनिवार-रविवार हक्काची सुट्टी मिळणार आहे. देशातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये 5 दिवसांच्या आठवड्याची पद्धत आहे. परंतु, अशा कंपन्यांपैकी अनेक ठिकाणी हेच 5 दिवस कर्मचाऱ्यांकडून 8 तास नाही तर 9 तास काम करून घेतले जाते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप कसे राहील हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. तसेच सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती सुद्धा जारी करण्यात आलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निश्चितच सुखद निर्णय आहे.