नवी दिल्ली । काँग्रेसच्या खासदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी आज संसदेत आक्रमक पवित्रा घेतला.
लोकसभेत मंगळवारी काँग्रेसच्या खासदारांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच कागदपत्रे फाडून त्याचे बोळे अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले होते. यामुळे काँग्रेसच्या सात गोंधळी खासदारांचे उर्वरित दिवसातील कामकाजासाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी यांनी गुरुवारी केली होती. यात गौरव गोगोई, टी. एन. प्रतापन, डीन कुरिकोसे, मणिकम टागोर, राजमोहन उन्नीथन, बेनी बेहनन आणि गुरजीतसिंग औजला यांचा समावेश आहे. यावरून आज काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला.
काँग्रेस खासदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई चुकीचा असल्याचा आरोप काँग्रेसच्या सदस्यांनी केला. कोणत्या आधारावर खासदारांचे निलंबन करण्यात आले, याची आपणास कल्पना नसल्याचे काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी सांगितले. तृणमूलचे सुदीप बंडोपाध्याय, द्रमुकचे दयानिधी मारन, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनीदेखील खासदारांचे निलंबन चुकीचे असून ते मागे घेतले जावे, अशी मागणी केली.
लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरु झाले. काँग्रेस खासदारांनी निलंबनाच्या मुद्यावरुन घोषणाबाजी सुरु केली. गदारोळामुळे पीठासीन अधिकार्यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. मात्र यात सुधारणा करुन परत दुपारी १२ वाजता कामकाज बोलाविण्यात आले. यावेळी २ ते ५ मार्च या कालावधीत गदारोळाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना केली जात असल्याची माहिती देण्यात आली. लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही समिती गदारोळाची चौकशी करणार असून सर्व पक्षांचे नेते समितीत सामील असतील. विरोधी पक्षांकडून वारंवार पंतप्रधानांचा अवमानकारक उल्लेख केला जात असल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी यावेळी केला. गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज ११ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.