जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथील परिसरात तब्बल २१ वर्षानंतर आदिवासी कोळी समाजाच्या वतीने रविवारी २१ मे रोजी दुपारी १२ वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी १४ जोडपी विवाहबध्द झाली होती.
कार्यक्रामाच्या सुरूवातीला विवाहबध्द होणाऱ्या १४ जोडप्यांची सकाळी ९ वाजता शाहू नगरातील तपस्वी हनुमान मंदिरापासून पारंपारिक पध्दतीन बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. हा सामूहिक विवाह सोहळा पुर्णपणे मोफत ठेवण्यात आला होता. या कोळी समाजाच्या सामुहिक सोहळ्यात वर व वधू यांना अखिल भारतीय कोळी समाजा संघटनेच्या वतीने मोफत कपडे, बुट, चप्पल ते सोन्याचे व चांदीचे दागिने यासह संसारोपयोगी वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले. वरातीत (मिरवणूक) डीजे व कर्कश वाद्ये न लावता सनई वाद्यावर समाज बांधव आदिवासी कोळी संस्कृतीनुसार कोळी नृत्य सादर करण्यात आली. सध्या उष्णता अधिक असल्याने त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी खास २८० कापडी मंडप टाकले असून, त्या ठिकाणी १५ जम्बो कुलर लावण्यात आले होते. तर नवजात शिशू व महिलांसाठी हिरकणी व वधू-वरांना स्वतंत्र मेकअप कक्ष तयार करण्यात आला होता. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष परेशभाई कोळी यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्याहस्ते द्विपप्रज्वलन करून विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, अखिल भारतीय आदीवासी कोळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष परेशभाई कोळी, नगरसेवक कैलास सोनवणे, संघटनेचे प्रदेश सचिव अनिल नन्नवरे, जिल्हाध्यक्षक प्रविण बाविस्कर, रोहण सोनवणे, रमाकांत सोनवणे, भीकन नन्नवरे, युवक जिल्हाध्यक्ष धनराज साळुंखे, सचिव सुकदेव रायसिंग यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.