खळबळजनक : दारू पिण्याच्या वादातून जळगावात हॉटेल मालकाचा खून !

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पितांना झालेल्या वादातून हॉटेल मालकाचा निर्घुण खून झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय ५० रा. आसोदा ता. जळगाव) असे मयताचे नाव आहे.

 

आज दुपारी ५ : ३० वाजेच्या सुमारास नेरी स्मशान भूमीलगत असलेल्या आसोदा मटन हॉटेलमध्ये दोन तरुण दारू पीत बसले होते. यावेळी हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे यांच्या सोबत कुठल्यातरी विषयातून त्यांचा वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे पर्यावसन हाणामारीवर झाले. यावेळी दोघं तरुणांनी चिरमाडे यांच्यावर हल्ला चढविला. यातील एका हल्लेखोराने बिअरची बाटली थेट चिरमाडे यांच्या मानेत खुपसली. यानंतर जखमी अवस्थेत चिरमाडे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले होते. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले होते. दरम्यान, मयत चिरमाडे यांचा मुलगा गिरीश याने हल्लेखोरांना पहिले असून त्यातील एकाची ओळख देखील पटली असल्याचे कळते. तर आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

Protected Content