खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू – चंद्रकांत पाटील

 

पुणे: ‘वृत्तसंस्था । नाराज होणं आणि नाराजी दूर होणं ही एक प्रक्रिया असते. एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच ते पुन्हा उत्साहाने पक्षात सक्रिय होतील,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

पुण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. ते २३ तारखेला सीमोल्लंघन करतील असं बोललं जात आहे. त्यासाठी जळगावातील त्यांचे कार्यकर्ते गुरुवारी मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत, अशीही चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल खडसेंबद्दल बोलताना त्यांच्या क्षमतेचं कौतुक केलं होतं. खडसे यांचं कर्तृत्व आणि खानदेशात त्यांचं असलेलं स्थान दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यांच्या कामाची नोंद घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. ही नोंद घेतली जाईल त्या पक्षात जाण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यांना एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो,’ असं पवार यांनी म्हटलं होतं. पवारांच्या या सूचक वक्तव्यानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकताच बाकी असल्याचं बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा खडसे भाजपमध्येच राहतील, असा विश्वास व्यक्त केला. ‘नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. पक्षाचं नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. सगळं सुरळीत होईल व त्यांच्या पक्षांतराची चर्चा घडवून आणणाऱ्यांचा हिरमोड होईल,’ असं पाटील यांनी सांगितलं.

Protected Content