वरणगाव दत्तात्रय गुरव | मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मारण्याची धमकी रोहिणी खडसे यांनी दिली व एकनाथराव खडसे यांनीही आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोटे आरोप केले, याच्या निषेधार्थ भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
बोदवड नगरपंचायतीच्या मतदानादिवशी झालेल्या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली असून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकावरती गुन्हे दाखल केले आहेत. रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना मारण्याची भाषा केली आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझ्या जीवाला खडसे कुटुंबाकडून धोका असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज शिवसेनेच्यावतीने बस स्टॅन्ड चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी केली व आंदोलन करण्यात आले.