जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीने राबवलेल्या स्वच्छ भारत मिशन योजनेची चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच रोजगार हमी योजनेबाबत खोटा अहवाल सादर केल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, जि.प.मधील वरीष्ठ व सक्षम अधिकार्यांच्या नियंत्रणात समिती गठीत करावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पँथरचे आज २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी स्वच्छ भारत मिशन योजनेत मयत झालेल्या व्यक्तींची नावे टाकून आलेल्या निधीचा मोठा गैरवापर करण्यात आला आहे. यासंदर्भात भुसावळ गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेत लाखो रूपयांचा अपहार केला आहे. ग्रामपंचायतीला चौदाव्या वित्त आयोगानुसार निधी मिळतो यात जवळपास ५ ते ६ कामे दाखविण्यात आले आहे. यात दोनदा गावात पाईपलाईन, संरक्षण भिंत, पंपहाऊस, शाळाखोली दुरूस्ती, एलईडी लाईट यात शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा निधी हडप केला आहे. दलीत वस्ती सुधार योजनेतही अपहार केला आहे. योजनसंदर्भात बँक पासबुक दाखविण्याची मागणी केली असता ग्रामसेवक विजय काकरवाल यांनी अद्यापपर्यंत माहिती पुरविली नाही. आमदार निधीतून ठेकेदाराने रस्त्याचे काम न करता परस्पर बिले काढून घेतली आहेत आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेतही एकच काम दोनदा दाखविण्यात आले आहे. याची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय दलीत पँथरच्या वतीने आज सोमवार २३ ऑगस्ट रेाजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.