क.ब.चौ. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ३ मे रोजी होणार ऑनलाईन; पत्रपरिषदेत प्रभारी कुलगुरूची माहिती

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ सोमवार ३ मे २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता ऑनलाईन संपन्न होत असून, या समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. 

या दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी राहणार असून स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हया दोन्ही मान्यवरांचा दीक्षांत समारंभातील पदवीधरांशी होणारा संवाद हा निश्चित आगळा-वेगळा राहील असे प्रा.ई. वायुनंदन यांनी सांगितले. 

या दीक्षांत समारंभासाठी ४९ हजार ७५३ इतके स्नातक पदवी प्राप्त करण्यासाठी पात्र असून त्यापैकी नोंदणी केलेल्या२८ हजार ९८ स्नातकांना या दीक्षांत समारंभामध्ये पदवी प्रदान केली जाणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३५८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ५ हजार १८९ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार ३५ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार ७९ स्नातकांचा समावेश आहे. त्यामध्ये २६१ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक. चे ४३७ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे.  

 

या पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या सहाय्याने मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राम मुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे.

 

तसेच सदर समारंभ ऑनलाइन असल्याने स्नातकांना ऑनलाईन उपस्थिती देता येणार आहे.  त्याकरीता स्नातकांसाठी विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in वर लिंक दि. ३ मे २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता उपलब्ध होईल.  तसेच संस्थाचालक, प्राचार्य, प्रशाळा संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक हे या समारंभामध्ये याच लिंकव्दारे ऑनलाईन कार्यक्रम पाहू शकतात.

 

९९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झालेले असून (यात ६६ विद्यार्थिनी आणि ३३ विद्यार्थी यांचा समावेश आहे), सुवर्णपदक प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. सध्याची कोविड प्रार्दूभावाची परिस्थिती लक्षात घेऊन या दीक्षांत समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाव्दारे पाठविले जाणार आहे.  तसेच सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनाही या समारंभात  सुवर्णपदक दिले जाणार नाही.  त्याबाबतची माहिती या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या कळविली जाईल. तसेच अधिकची माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याकरीता विद्यार्थ्यांनी विद्यापीठ संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी.

 

या पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी.पाटील उपस्थित होते.

Protected Content