जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना आणि नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव येथील महाराज ज.प. वळवी कला, वाणिज्य व व्ही.के. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ११ हजार बांबू रोपांची लागवड होणार असून त्यानिमित्ताने शनिवार १९ सप्टेंबर रोजी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबीनारचे उद्घाटन होणार आहे.
आत्मनिर्भर भारत या संकल्पपुर्तीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी मोठ्या स्तरावर बांबू रोपांची लागवड धडगाव भागात केली जाणार आहे. यावर विविध अंगाने चर्चा व्हावी यासाठी बांबू मिशन अंतर्गत रोपांची लागवड या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबीनार सेमिनार शनिवारपासून सुरु होत आहे. शनिवारी १०.१५ वाजता या वेबीनारचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, व्य.प. सदस्य दिलीप पाटील, रा.से.यो.चे राज्य कार्यअधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, विभागीय संचालक डी. कार्तीज्युन, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार यांची उपस्थिती असेल.
उद्घाटनानंतर दक्षिण बांबू असोसिएशनचे माजी अध्यक्ष कामेश सलाम, निलम मंजूनाथ, डॉ. पुष्पाकुमारी यांची व्याख्याने होणार आहेत. दुपारच्या सत्रात बांबूपासून बनविलेल्या साहित्याचे प्रदर्शन दाखविण्यात येणार आहे. रविवारी बांबू रोपांची लागवड विविध संघटनांच्या सहकार्याने केली जाणार आहे. त्यानंतर या वेबीनारमध्ये सुनील देशपांडे,टी.एस. रेड्डी, योगेश शिंदे, राजशेखर पाटील, आर.डी. पाटील यांची व्याख्याने होतील. अशी माहिती रा.से.यो.चे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी दिली. धडगाव येथील महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहकार्याने गेल्या दोन वर्षापासून बांबूपासून विविध वस्तू तयार करणाऱ्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्यात. बांबू रोपांची नर्सरी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाते. असे प्राचार्य एच.एम. पाटील यांनी दिली.