कोव्हिशिल्ड , कोव्हॅक्सिन लसीच्या संमिश्र वापराच्या अभ्यासाला परवानगी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरल्याचा निष्कर्ष आल्यानंतर भारतीय औषध नियामक मंडळाने या  अभ्यासासाठी परवानगी दिली आहे.

 

वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये यासंबंधीचा अभ्यास आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. २९ जुलैला केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने अभ्यास करण्यासाठी शिफारस केली होती.

 

बैठकीदरम्यान तज्ज्ञ समितीने ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला ३०० निरोगी स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या संमिश्र लसीची मात्रा देऊन चौथ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली होती. एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींच्या मात्रा देऊ शकतो का हे पडताळणं या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे.

 

 

उत्तर प्रदेशात १८ व्यक्तींना कोव्हिशिल्ड लशीनंतर चुकून कोव्हॅक्सिन लस दिली गेल्यानंतर त्यांचा अभ्यास केला असता एकाच लशीच्या दोन मात्रांपेक्षा दोन लशींच्या मात्रांचा संमिश्र वापर अधिक परिणामकारक ठरतो, असा निष्कर्ष ‘आयसीएमआर’ने काढला होता.

 

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथे १८ व्यक्तींना चुकून दोन वेगवेगळ्या लशींच्या मात्रा देण्यात आल्या होत्या. त्यांचा तुलनात्मक अभ्यास एकाच लशीच्या दोन मात्रा दिलेल्या व्यक्तींशी करण्यात आला. संमिश्र लस घेतलेल्यांमध्ये अल्फा, बिटा आणि डेल्टा विषाणूंविरोधात अधिक परिणामकारकता आढळली. शिवाय आयजीजी प्रतिपिंडेही मोठय़ा प्रमाणात दिसून आली. विषाणूला प्रतिकार करणाऱ्या प्रतिपिंडांची संख्याही अधिक आढळली, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अभ्यासात नमूद केले आहे. ‘आयसीएमआर’च्या अभ्यासाचा अहवाल ‘मेडआरएक्सआयव्ही’ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. ‘अ‍ॅडेनोव्हायरस’च्या मदतीने तयार केलेली लस निष्क्रिय केलेल्या  विषाणूचा वापर असलेल्या लशीनंतर देण्यात आल्याने संबंधितांमध्ये चांगले परिणाम दिसले, पण या दोन वेगवेगळ्या लशी ठरवून दिलेल्या नव्हत्या, तर चुकून तसे झाले होते, असे या अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारचा संमिश्र लशींचा वापर केवळ सुरक्षितच नाही तर त्यातून उत्तम प्रतिकारशक्तीही निर्माण होते, असेही या अभ्यासातील निष्कर्ष आहेत.

 

कोव्हिशिल्ड ही लस ‘अ‍ॅडेनोव्हायरस’चा वापर करून तयार करण्यात आली आहे, तर कोव्हॅक्सिनमध्ये व्हिरीयॉन बीबीव्ही १५२ विषाणूचा वापर करण्यात आला आहे.

 

लसीकरणाचे प्रमाणपत्र आता काही सेकंदांत व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर मिळू शकेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. +९१ ९०१३१५१५१५ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर ‘covid certificate’ असे टाइप करून पाठवल्यानंतर ओटीपी येईल. तो भरल्यावर लगेच प्रमाणपत्राची पीडीएफ प्रत लाभार्थ्यांला मिळेल.

 

Protected Content