जळगाव प्रतिनिधी । कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत:कडे व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती नेमण्याचा मानस आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे रुग्णालय बनविण्याचा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
येथील वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण व वातानुकुलीत 30 खाटांचे आयसीयू बेडच्या अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राउत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेसह महाविद्यालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, 30 खाटांचा अतिदक्षता विभाग व प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार माणून कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वजण कोरोना योध्दाची भूमिका बजावत आहात याबद्दलही त्यांनी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद दिले. कोरोनाला हरवायचे असेल तर यापुढील काळात प्रत्येक नागरीकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
कोरोनापूर्वीच्या काळात सामान्य रुग्णालयात 12 व्हेटीलेटर होते. आता याची संख्या 71 इतकी झाली आहे. ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध नव्हते. परंतु आता 311 बेड ऑक्सिजनयुक्त झाले आहे. यात 30 बेड वातानुकुलीत आहेत. गॅस पाईपलाईनद्वारे 311 बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहे याकरीता 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासन तसेच सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून 50 बेड ऑक्सिजयुक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात होताच 7 एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीत जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली. त्यास मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने आठ दिवसात मान्यता दिली. पुढील आठच दिवसात प्रयोगशाळेच्या बांधकामासाठी व बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला व त्यानंतर इतर कामांसाठी 18 लाख रुपये मंजूर केले. याप्रमाणे प्रयोगशाळेसाठी 78 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून खर्च करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेमध्ये पूर्वी 160 नमुने तपासण्यात येत होते. आता एक मशीन वाढविण्यात आल्याने दररोज 300 नमुने तपासण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.