वुहान, वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसबद्दल सर्वात आधी चीन सरकारला चेतावणी देणाऱ्या डॉक्टरच्या मृत्यूनंतर आता कोरोना व्हायरसचं सत्य जगासमोर मांडणारा पत्रकार बेपत्ता झाला आहे. चेन क्यूइशी असे या पत्रकाराचे नाव असून ते एक मानवाधिकार कार्यकर्ताही होते. गुरुवार रात्रीपासून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. क्यूइशी यांनी कोरोना व्हायरसचं रिपोर्टिंग करताना वुहानमधील परिस्थिती जगासमोर मांडली होती. त्यांनी अनेक व्हिडीओ पोस्ट केले होते. या व्हिडीओमधून त्यांनी चीन सरकार कोरोना व्हायरसकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करत आहे हे दाखवण्यात आले होते.
क्यूइशी यांच्या रिपोर्टिंमध्ये चीनमध्ये स्थानिक पातळीवर नेमकी काय परिस्थिती आहे हे जगासमोर आले होते. सरकारकडून सेन्सॉरशिप लावण्यात आल्यानंतरही क्यूइशी व्हिडीओ शेअर करत होते. क्यूइशी यांच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, ते आपल्या मित्रांसोबत गुरुवारी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाहीत.
क्यूइशी यांच्या आईने ट्विटर अकाऊंटला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्या सांगत आहेत की, “मी क्यूइशी याची आई आहे. कृपया ऑनलाइन मित्र आणि खास करुन वुहानमध्ये आहेत त्यांनी क्यूइशी याचा शोध घेण्यात मला मदत करा”. क्यूइशी यांच्या मित्रांनी मात्र प्रशासनाने त्यांना वेगळं ठेवलं असल्याचा दावा केला आहे. दरम्यान क्यूइशी यांचा फोन सध्या अनरिचेबल आहे.
क्यूइशी यांनी सरकारने वेस्टर्न सोशल मीडियावर लावलेल्या बंदीविरोधात जात ऑनलाइन युट्यूब आणि ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केले होते. तसंच व्हायरबद्दल अपडेट दिल्या होत्या. दोन्ही ठिकाणी त्यांना चांगलेच फॉलोअर्स होते. योगायोग म्हणजे डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यू झाला त्याच दिवशी क्यूइशी बेपत्ता झाले आहेत.
व्हायरसबद्दल चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचाही मृत्यू
ली वेनलियांग यांनी सर्वात आधी चीन सरकारला कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी दिली होती. दुर्दैवी बाब म्हणजे ज्या व्हायरबद्दल त्यांनी सरकारला चेतावणी देण्याचा प्रयत्न केला त्याचीच लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ली वेनलियांग यांनी चेतावणी दिल्यानंतरही सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला होता.
नेत्रचिकित्सक ३४ वर्षीय ली वेनलियांग वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये काम करत होते. ३० डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या मित्रांना मेसेज करुन हा व्हायरस वेगाने पसरत असल्याचं सांगितलं होतं. या जीवघेण्या व्हायरसबद्दल सर्वात आधी त्यांनीच चेतावणी दिली होती. रुग्णालयात दाखल काही रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसत असल्याचं त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना सांगितलं होतं.