मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलविले आहे.
आर्थर रोड कारागृहाची क्षमता ८०५ कैदी सामावण्याची आहे. मात्र, सध्या तिथे ३,४०० कैदी होते. यापैकी ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. तसेच, विविध गुन्हे प्रकरणातील सुनावणीसाठी कैद्यांना पुढचे काही दिवस न्यायालयात नेले जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, अत्यावश्यक सुनवाणी प्रकरणं ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होतील. आर्थर रोडप्रमाणे ठाणे, कल्याण मधील जादा कैदी तळोजा कारागृहात हलवणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कैद्यांना निसर्गोपचारही देण्यात येणार आहे.